आयुर्वेद Ayurveda

आयुर्वेद Ayurveda
- the legacy...the heritage...the art of happy and healthy being...

Ayurveda update: View BHHAS programs' list (Marathi)

Namaste.

"Welcome to Maaze Bhhas-my illusions.

I hope you all feel free to write anything you want to share.
I hope, we all create a better world-with words...
I hope we keep connected...to each other, to our selves!"

Dr.Atul

9 Apr 2016

तू विचारलंस,
"जर 'थ्री नाईन' थर्टी नाईन ... 'टू नाईन' ट् वेंटी नाईन ...
तर 'वन नाईन' वन्टी नाईन का नाही बाबा?"
प्रश्न सोपा होता तरीही..
मी उत्तर देऊ शकलो नाही पोरा...

तू 'टेबल्स्' गुणगुणत असतोस तेव्हा ऐकत असतो मी आपोआप...
मला कळत नाही, तू 'वन्झा' या शब्दाचा अर्थ विचारलास तर तुला काय सांगू?

आभाळ दाटून आलं की मला आठवतात,
माझ्या गावातल्या शेतातल्या म्हातारीचे पावसावाचून सुकलेले डोळे...
रानातल्या पेरणीत अडकलेला तिचा सुरकुतला जीव...
माझ्या सुशिक्षित आई बाबांनी आठवड्यातून दोनदा तासभर येणाऱ्या पाण्यासाठी मध्यरात्रीपासून पाह्यलेली वाट...
अन् आभाळ दाटून आलं की तू गात असतोस...
"रेन रेन गो अवे... "

तू म्हणतोस "जिंगल बेल्स्... जिंगल बेल्स्...."
तेव्हा चित्रातला रेनडियर आणि सांताक्लॉज फेर धरून नाचत राहतात माझ्या मनभर
मी कधीही न पाह्यलेल्या भुरभुरणाऱ्या स्नोफॉलच्या साथीनं...

'किरमिजी' रंगाला, वरण भाताला,
सापडेल ना तुला प्रतिशब्द...
कळेल का तुला मजा अंगतपंगतीची... इरजिकाची?

तुला कळेल का रे कधी
ग्रेस-बोरकरांची, कुसुमग्रजांची,  शांताबाईंची, आशयघन कविता...
की तुला शेली, कीट्स्, शेक्सपीयर यांचं कूळ जवळचं वाटेल...
की कुणाशीच जुळणार नाही तुझी नाळ...

भिती वाटत राहते पोरा...
जेव्हा मी ऐकतो
तुझी भाषा...
"बाबा 'माझी' मदत कर..."
"बाबा, मी हावाला शर्ट घालणार नाही..."
असं काय काय बोलतोस तू...
तेंव्हा वाटतं...

संक्रमणाच्या अनावर वेगात...
बदलाच्या अपरिहार्य प्रक्रियेत...
सापडेल ना तुला
तुझं 'आपलं' काहितरी...

टिकाऊ, खोल, आत कायम सांभाळून ठेवावं असं...

डॉ. अतुल राक्षे
९४२२०३४५०६

No comments:

Post a Comment